महात्मा मोहनदास करमचंद गांधी
From Wikipedia
मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, १८६९ - जानेवारी ३०, १९४८) हे महात्मा गांधी या नावाने ओळखले जातात. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली - महात्मा संस्कृत भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ आहे 'महान आत्मा'. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
गांधीजींचा जन्म ऑक्टोबर २, १८६९ या दिवशी गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. शालेय शिक्षण संपवून ते इंग्लंडला गेले. तेथे जाण्याआधीच त्यांचा विवाह कस्तूरबा यांच्या बरोबर झाला. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले.
एका मित्राने त्यांना मुकदमा लढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला बोलावले. तेथे रंगभेद आणि त्यातुन होणाऱ्या अत्याचारांचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. त्यांनी तेथे रंगभेद नीतीचा विरोध केला. दक्षिण आफ्रिकेवरून परत येण्याआधी त्यांनी भारतात ख्याती प्राप्त केली होती.
भारतात परत आल्यावर त्यांनी इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह सुरू केला. त्यांनी स्वदेशी वस्तुंचा प्रचार केला आणि इंग्रज सरकारचे जुलुमी कायदे मोडले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांमधील दांडी यात्रा प्रसिद्ध आहे, तेथे त्यांनी इंग्रजांनी लावलेल्या मिठावरील कराचे उघड उघड उल्लंघन केले. काही वर्षांनंतर त्यांनी "भारत छोडो" चा नारा लावला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला इ.स. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
ते अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी शुद्र आणि दलित लोकांना हरिजन हे नाव दिले. महात्मा गांधी सर्व धर्मांना बरोबरचे स्थान देत होते. त्यांचे आवडते गाणे होते - "रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम । ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान ॥"
जानेवारी ३०, १९४८ ला प्रार्थना सभेला जात असताना गांधीजींवर बंदुकीने गोळ्या चालवुन नथुराम गोडसे याने त्यांची हत्या केली. 'हे राम' असे म्हणत त्यांनी मरणाला कवटाळले. त्यांची समाधी दिल्लीमध्ये राजघाटावर आहे जेथे लोक त्यांना अजुनही श्रद्धांजली वाहतात.
विश्वभरात गांधीजींना अहिंसा आणि सत्याग्रह यांचे प्रतीक मानले जाते. त्यांची आत्मचरित्र "माझे सत्याचे प्रयोग" हे आहे.mr:महात्मा गांधी