स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
From Wikipedia
स्वातंत्र्यवीर विनायक दामॊदर सावरकर हॆ एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक आणि हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार आणि जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला होते.
त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते आचार्य प्रह्लाद केशव अत्रे यांनी दिली.
अनुक्रमणिका |
[संपादन] चरित्र
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. विनायकराव हे त्यांचे दुसरे चिरंजीव. थोरले बाबाराव आणि धाकटे नारायणराव. सावरकरांची आई त्यांच्या लहानपणीच वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी ह्यांनी त्यांच्यावर आईसारखीच माया केली.
सावरकर लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चापेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.
श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी भलामण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.
१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते स्वातंत्र्यानंतर प्रसिद्ध झाले.
सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर ह्यांनी राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन ब्रिटिश शासनाने त्यांना जन्मठेपीची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.
[संपादन] सावरकर साहित्य
[संपादन] ग्रंथ आणि पुस्तके
- १८५७ चे स्वातंत्र्यसमर (इ.स. १८५७ च्या युद्धाचा स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून तो लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास पहिल्यांदा त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून जोडला)
- इतिहासातील सहा सोनेरी पाने
- माझी जन्मठेप
- काळेपाणी
- मला काय त्याचे
- हिंदुत्व
[संपादन] कविता
- कमला (महाकाव्य)
- सागरास (सागरा प्राण तळमळला)
- जयोऽस्तुते श्री महन्मंगले
- प्रभाकरास
[संपादन] संदर्भ
ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि. श्री. जोशी
शोध सावरकरांचा - य. दि. फडके
[संपादन] बाह्यदुवे
- चरित्र -
- Who was Veer Savarkar? - रिडिफ संकेतस्थळावरील लेख (प्रश्नोत्तर स्वरूपात)
- The mastermind? - आउटलूक या साप्ताहिकाचा लेख ज्यामध्ये गांधीहत्येच्या कटाचे (मुख्य) सुत्रधार सावरकर असल्याचा दावा करण्यात आला. (नोंदणी आवश्यक)