प्राकृत
From Wikipedia
संस्कृत भाषा व आधुनिक भाषा (उद.मराठी भाषा ) यांच्यातील पायरी.
प्राकृत हा शब्द प्रकृती वरून आला. प्राकृत म्हणजे जे नैसर्गिक आहे ते.प्राकृत म्हणजे जनसामान्यांची भाषा, या भाषांचा उगम लक्षात घेता त्यांचे व्याकरण फार समग्र नव्हते. संस्कृताच्या मानाने प्राकृत भाषेतील व्यंजने, व्याकरण हे मर्यादित होते.बर्याच जुन्या संस्कृत नाटकांमध्ये उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत तर हलक्या लोकांची भाषा प्राकृत दिसते. लेखी आणि कामकाजाच्या भाषेसाठी प्राकृताचा वापर न होता संस्कृत वापरली जात असावी.
ई.स.पूर्व ६व्या शतकात प्राकृत भाषा बोलली गेल्याचे पुरावे आढळतात. तर सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत लेखी प्राकृताचे पुरावे मिळालेले आहेत. प्राचीन व मध्ययुगीन भारतात सुमारे ३८ प्राकृत भाषा बोलल्या जात असे सांगितले जाते. असे असले तरी तत्कालिन समाजव्यवस्थेमुळे या भाषांना मातृभाषेचा किंवा राज्यभाषेचा दर्जा प्राप्त नव्हता.
काही प्राकृत भाषा याप्रमाणे - मागधी ,शौरसेनी ,पैशाची ,महाराष्ट्री भाषा , अर्धमागधी भाषा ,अपभ्रंश भाषा ,पाली इ. यापैकी महाराष्ट्री भाषा ही भाषा सातवाहन राज्यकाळातील प्रमुख भाषा गणली जाते. या भाषेत साहित्य लिहिले गेल्याचे पुरावे मिळतात. ख्रिस्तपूर्व काळातील प्राकृत शिलालेखही सापडले आहेत, सातवाहन राजा हलाने प्राकृत कवितांचे संकलन केल्याचे उल्लेख मिळतात. मराठी हे महाराष्ट्री भाषेचे सुधारीत रूप आहे.
[संपादन] नाट्यशास्त्र आणि प्राकृत
भास व भरतमुनी यांच्या प्राचीन नाटकांतील सर्व महत्त्वाची पुरूष पात्रे संस्कृत बोलतात तर स्त्रिया, मुले व इतर सामान्यजन प्राकृतात बोलतात. नाट्यशास्त्रात कोणी कोणती भाषा बोलावी याबाबत नियम केलेले आहेत आणि निरनिराळ्या लोकांसाठी निरनिराळ्या भाषा वापरल्या आहेत. जसे, नाटकातील स्त्रिया, मुले व विदूषक शौरसेनी बोलतात, बायका गाताना महाराष्ट्री भाषा वापरतात. सेवक वर्ग, कोळी व इतर सामान्यजन मागधी भाषा वापरतात तर राजे, अमात्य, विद्वान संस्कृतात बोलतात.
एक उदाहरण द्यायचे झाले तर शाकुंतलात शकुंतला आपल्या सख्यांशी प्राकृतात बोलते. राजा दुष्यंताशीही प्राकृतात बोलते परंतु दुष्यंत शकुंतलेशी संस्कृतात बोलतो.
प्राकृताचा विचार करायचे झाल्यास प्राकृतातही नाटके, नैतिक, ऐतिहासिक काव्यसंग्रह लिहिले गेले. जैन धर्मातील साहित्य प्राकृतातच लिहिलेले आढळते. इसवी सनानंतर पंधराव्या शतकापासून प्राकृत साहित्याला उतरती कळा लागली. याचे कारण संस्कृत+प्राकृताच्या संगमातून आधुनिक भाषांचा उदय हे असू शकते.
संस्कृत भाषा->प्राकृत भाषा->आधुनिक भारतीय भाषा